भारतीय वायुदलाचे योगदान महत्त्वपूर्ण
भारतीय वायुदलाचे सामर्थ्य,सज्जता , अग्निविरवायू यांचे प्रशिक्षण तसेच भारतीय वायू दलाने पार पाडलेल्या देश विदेशातील कामगिरी यांची माहिती देण्यासाठी माध्यम प्रतिनिधींना सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे निमंत्रित करण्यात आले होते.
प्रारंभी भारतीय वायुदलाचा इतिहास , सांबरा विमानतळाचा इतिहास यांची सचित्र माहिती देण्यात आली.नंतर देशातील नैसर्गिक आपत्ती प्रसंगी आणि परदेशात उदभवलेल्या कठीण समयी भारतीय हवाई दलाने पार पाडलेल्या कामगिरीची,भारतीय हवाई दलाचे राष्ट्र निर्माणातील योगदान याची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली.
सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूल मध्ये दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची माहिती तेथील वेगवेगळ्या विभागांना भेट देऊन देण्यात आली.विमानाचे विविध भाग,त्याला जोडली जाणारी शस्त्रास्त्रे,आपत्कालीन प्रसंगी बचाव करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा,संगणक केंद्र, किचन येथे भेट देऊन प्रतिनिधींनी माहिती जाणून घेतली.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या जिमनॅकस्टनी यावेळी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.अडथळे पार करणे, भिंतीवर चढणे अशी अनेक प्रात्यक्षिके प्रशिक्षणार्थीनी सादर केली.सध्या सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलमध्ये अग्निविरवायू अंतर्गत निवड झालेल्या दोनशे महिला येथे प्रशिक्षण घेत आहेत.
सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलचे एअर ऑफिसर कमांडिंग , एअर कमोडोर एस.श्रीधर यांनी हवाई दलाचे कार्य जनते पर्यंत पोचवण्यात माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद करून आभार मानले.