तारिहाळ येथे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या वॉटरमॅनचा मृतदेह ८ कि.मी.वर सापडला
बेळगाव :
तारिहाळ येथील ग्रामपंचायतीतील पाणीपुरवठा विभागात वॉटरमॅन म्हणून कार्यरत असलेले सुरेश निजगुणी गुंडन्नावर (वय ५१) हे वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली.
६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तारिहाळ गावाजवळील हळ्ळाचा (ओढा) प्रवाह वाढल्यामुळे सुरेश गुंडन्नावर हे आपल्या टीव्हीएस दुचाकीवरून ओढा ओलांडत असताना पाण्याच्या जोरदार लाटेत वाहून गेले. दुसऱ्या दिवशी, ७ ऑगस्ट रोजी, त्यांची मोटारसायकल ओढ्याच्या पात्रातच, अपघाताच्या ठिकाणापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर सापडली.
घटनेनंतर सलग पाच दिवस तारिहाळ गावापासून तिगडी धरण परिसरापर्यंत ओढ्याच्या दोन्ही काठांवर आणि पाण्यात तीव्र शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर १० ऑगस्ट रोजी, अपघाताच्या ठिकाणापासून जवळपास आठ किलोमीटर अंतरावर, गेणिकोप्पा गावाजवळ त्यांचा मृतदेह सापडला.
मृतदेहाची पंचनामा कार्यवाही करून तो पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून, बैलहोंगल पोलिस ठाण्यात पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.