गांजाविक्री प्रकरणात आरोपीस पाच वर्षांची कठोर शिक्षा; बेळगाव न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
बेळगाव :
गांजाची अवैध विक्री करणाऱ्या आरोपीस बेळगाव न्यायालयाने कठोर शिक्षा ठोठावली आहे. सन 2008 पासून आतापर्यंत दाखल झालेल्या एन.डी.पी.एस. प्रकरणांमध्ये शिक्षा झालेला हा पहिला निकाल ठरला आहे.
दिनांक 03 ऑक्टोबर 2024 रोजी बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सी.ई.एन. गुन्हे शाखा पोलिसांनी केलेल्या छाप्यात आरोपी समीर राजेसाब लम्मनवर (वय 36, रा. सत्तूर आश्रय कॉलनी, धारवाड) यास अटक करण्यात आली होती. त्याच्या ताब्यातून ₹1,20,000 किंमतीचा एक किलो 22 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता.
या प्रकरणाची चौकशी पोलीस निरीक्षक श्री. बी. आर. गड्डकर यांनी केली. प्राथमिक कारवाई पीएसआय श्री. व्ही. जी. घंटामठ यांनी केली होती. पोलीस उपनिरीक्षक व कर्मचारी वर्गाच्या संयुक्त कारवाईनंतर आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
माननीय दुसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. गंगाधर के. एन. यांनी दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी निकाल देताना आरोपीस पाच वर्षांची कठोर शिक्षा व ₹50,000 दंड ठोठावला.
या प्रकरणातील तपास व कारवाईसाठी सहभागी अधिकाऱ्यांचे कौतुक करत पोलीस आयुक्तांनी त्यांना प्रशंसापत्र बहाल केले आहे.
हा निकाल गांजाविक्री व अमली पदार्थांच्या विरोधातील मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.