केएलई हॉस्पिटल आवारातच झाला अपघात
केएलई हॉस्पिटलचे आवारात एका भरधाव कारने धडक दिल्यामुळे एक पादचारी महिला 4 -5 फूट उंच उडवून रस्त्यावर आपटल्याची घटना आज सकाळी 8:10 वाजण्याच्या सुमारास घडली. दैव बलवत्तर म्हणून या अपघातात त्या महिलेला कोणतीही गंभीर इजा झाली नाही. आज सकाळी 8:10 वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटल आवारामध्ये केएलई नर्सिंग कॉलेज समोर रस्त्याकडेने चालत जात असलेल्या एका पादचारी महिलेला भरधाव कारने (क्र. केए 22 झेड 5753) धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की ती बिचारी बेसावध महिला 4 -5 फूट उंच उडवून रस्त्यावर आपटली.
हा प्रकार पाहून आसपासच्या नागरिकांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या महिलेला सावरले. दैव बलवत्तर म्हणून कारच्या धडकेमुळे त्या महिलेला फारशी दुखापत झाली नाही.
केएलई हॉस्पिटलचे आवार हे अलीकडे तेथील कर्मचारी, वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी आणि शिकाऊ डॉक्टरांसाठी जणू शर्यतीचे मैदान झाले आहे. हॉस्पिटल आवारा असल्यामुळे खरे तर या ठिकाणी वाहनांची ये-जा शिस्तीत संथ गतीने झाली पाहिजे. तथापि केएलई हॉस्पिटलमधील कांही कर्मचारी, वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी आणि पोस्ट ग्रॅज्युएट्स हॉस्पिटल आवारात सुसाट वेगात बेदरकारपणे आपली वाहने हाकत असतात.