आठवला ” गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा ” या चित्रपटातील तो मजेशीर सीन
बेळगाव : येळ्ळूर राजहंस गडावरील छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती अनावरण सोहळ्यावरून बेळगावचे राजकारण भलतेच तापले आहे. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि माजी आमदार संजय पाटील यांच्यात या सोहळ्यावरून चांगलीच जुंपली आहे.
संजय पाटील यांच्या पाठीशी माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी ढाल बनून भक्कमपणे उभे आहेत. तर “भैया मेरे रखी के बंधन को निभाना ” या लक्ष्मीबाईंच्या आर्त हाकेला साद घालून भावाचे कर्तव्य निभावताना विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी हे आपली बहीण लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या सोबत भक्कमपणे उभे आहेत. एकंदर शिवमूर्ती अनावरण सोहळा वाद राजकारणाच्या गरम तव्यावर चांगलाच तडतडत आहे.
मागील चार दिवसांपासून शाब्दिक द्वंद्व सुरूच होते. मात्र आज आगळाच प्रकार घडला. आज राजहंसगडावर पाहणीसाठी आमदार बंधू चन्नराज हट्टीहोळी आणि आमदार पुत्र मृणाल हेब्बाळकर गेले होते.ते पाहणी करून गडावरून गाडीने परतत होते. याचवेळी माजी मंत्री रमेश जारकीहोळी आणि माजी आमदार संजय पाटील आपल्या गाडीने प्रसार माध्यमांशी संवाद साधण्यासाठी राजहंसगडावर चालले होते. दोघांच्या गाड्या अमोरासमोर आल्या. आणि आठवला ” गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा ” या चित्रपटातील तो मजेशीर सीन.
नजरसमोर आले चंद्रकांत टोपे व बाजीराव डोळे आणि त्यांच्यातील, कोण गाडी मागे घेणार यावरून चाललेला वाद तसेच आजूबाजूला दोघांच्या घमासान वादाची मजा लुटणारे समर्थक वजा प्रेक्षक.
पण त्या चित्रपटात दोघेही तेथेच गाड्या टाकून तडातडा निघून जातात. पण इथे तसे काही घडले नाही बरं. चन्नराज हट्टीहोळी आणि रमेश जारकीहोळी यांच्यात गाडी मागे घेण्यावरून थोडा वाद झाला. दोघेही हट्टाला पेटले. वाटलं, नारायण पाटील उर्फ नारू पुढं यायचा आणि काहीतरी विपरीत घडायचं. पण, सुदैवाने तसे काही घडले नाही.
काही वेळाने चन्नराज हट्टीहोळी यांनी प्रसंगावधान राखून आपली गाडी थोडी मागे घेऊन आणि रमेश जारकीहोळी यांच्या गाडीला वाट मोकळी करून दिली. रमेशजी गडावर गेले तसे तेथे थांबलेल्या प्रसारमाध्यमांशी बोलताना चन्नराज हट्टीहोळी यांनी रमेश जारकीहोळी यांच्यावर शाब्दिक तोफांचा भडीमार करून प्रसारमाध्यम प्रतिनिधीसमोर त्यांचा पाणउतारा केला.