तिळगुळ घ्या गोड गोड बोला!
मंगळवारी मकर संक्रांतीचा सण
बेळगाव:
भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. या सण उत्सवापैकी एक असलेला मकर संक्रांतीचा सण मंगळवारी उत्साहात साजरा होणार आहे. ‘ तिळगुळ घ्या गोड गोड बोला’ असे म्हणत एकमेकांना तिळगुळ देऊन सणाचा आनंद द्विगुणित केला जाणार आहे.
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा भोगीचा सण देखील शहर आणि परिसरामध्ये सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भोगी साठी लागणारी बाजरीची भाकरी, कांदापात, सोले, वांगी, वाटाण्याच्या शेंगा, काळे तिळ , पांढरे तीळ , शेंगदाणे आणि इतर साहित्य खरेदीसाठी बाजारामध्ये गर्दी झाली होती. भोगी निमित्त प्रत्येकाने मेजवानीचा आनंद द्विगुणित केला.
मकर संक्रांत निमित्त तिळगुळ खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. तिळगुळ 80 ते 100 रुपये किलो दराने विकले जात होते.
सोले पन्नास रुपये गिरपाव, कांदापात वीस रुपयाला तीन पेंडी या दराने विकल्या जात होत्या. एकूणच मकर संक्रांति दिवशी एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोड गोड बोला, आमचे तिळगुळ सांडू नका आमच्याशी भांडू नका असा संदेश दिला जाणार आहे. नातेसंबंध अधिक बळकट करण्याचा आणि स्नेह वाढवण्याचा सण म्हणून मकर संक्रांतिकडे पाहिले जाते.