समाजात गैरसमज प्रसार करणाऱ्यांच्यावर तात्काळ कारवाई करा
कलबुर्गी जिल्ह्यातील मेळखेड क्षेत्राच्या ठिकाणी असलेले 400 वर्षांपूर्वीचे श्री जयतीर्थ वृंदावन उत्तराधिकारी मठाचे आहे. गंगावती तालुक्यात नववृंदावन म्हणून गाव आहे. तेथे देखील उत्तराधिकारी मठाचे श्री रघुवर्यतीर्थ वृंदावन आहे.
अलीकडे श्रीरायर मठाचे अर्थात श्री राघवेंद्र स्वामी मठाचे लोक या श्री रघुवर्यतीर्थ वृंदावनाला श्री जयतीर्थ असे संबोधू लागले आहेत. तसेच त्या अनुषंगाने चुकीची माहिती समाजात पसरवून लोकांना भडकवण्याचे काम करत आहेत. उच्च न्यायालयासमोर देखील मेळखेड येथील वृंदावन हेच मुळ श्री जयतीर्थ वृंदावन असल्याचे सिद्ध झाले आहे. श्री राघवेंद्र स्वामी मठाच्या लोकांकडून समाजात गैरसमज पसरवण्याद्वारे लोकांना भडकवण्याचा जो प्रकार केला जात आहे त्याला तात्काळ आळा घालण्यात यावा अशी मागणी आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
विश्वपद्म महापरिषदेच्या बेळगाव येथील पदाधिकारी आणि सदस्यांनी आज शुक्रवारी सकाळी मेळखेड (जि. कलबुर्गी) येथील उत्तराधिकारी मठाच्या श्री जयतीर्थ वृंदावनाबद्दल श्रीरायर मठाच्या अनुयायांकडून समाजात गैरसमज पसरवण्याद्वारे लोकांना भडकवण्याचा जो प्रकार केला जात आहे त्याला तात्काळ आळा घालावा, अशी मागणी विश्वपद्म महापरिषदेतर्फे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पोहोचविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकानी निवेदनाचा स्वीकार करून ते त्वरित मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी सदस्य आणि उत्तराधिकारी मठाचे अनुयायी उपस्थित होते.