बेळगाव, तारीख 30 डिसेंबर 2024 : चौसष्ट कलांमध्ये रांगोळी कलाप्रकाराचा उल्लेख वात्सायनाच्या कामसूत्रात आढळतो. त्यात म्हटले आहे की, रांगोळी म्हणजे मन प्रसन्न करणारी कला. रांगोळी काढणे ही एक अनुपम कला असून तिचा मूळ उगम धार्मिक अनुबंध व रचनेतून आला आहे. फलांची रांगोळी, धान्यांची रांगोळी, पाण्यावरील रांगोळी असे हे रांगोळीचे नेत्रसुखद स्वरूप दर्शनीय आहे. हिंदू, जैन व पारशी धर्मात रांगोळी शुभप्रद मानली जाते. रांगोळी अशुभापासून, दूषितापासून रक्षण करते. ही पूर्वापार चालत आलेली कलासंस्कृती आहे. म्हणून रांगोळीचे विलोभनीय रूपदर्शन पाहून ती मनामनाला भावते. कोरोना महामारीच्या नंतर उदयाला आलेल्या एंजल फाउंडेशन बेळगाव आणि डी मीडिया बेळगाव यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाजामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जातो. यांनी गेल्या पाच वर्षापासून अनेक विविध सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक,धार्मिक,मनोरंजन, कला, क्रीडा,साहित्य आरोग्य,सहकार खेळ इत्यादी अशा विविध अशा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून कमी वेळेत अधिक जनतेच्या मनात घर करणाऱ्या या दोन्ही संस्था आहेत.
वेगवेगळ्या स्पर्धांच्या आयोजन करून कलावंत कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी वेळोवेळी ते नेहमीच प्रयत्न करतात.नवोदित कलाकरांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून त्यांच्या भावी यशस्वी वाटचालीसाठी प्रेरणा व प्रोत्साहन देतात हे काही मोजक्याच संस्था आपल्याला पाहायला मिळतात. कोणतीही कला अवगत करायची असेल तर जिद्द चिकाटी मेहनत आणि कार्यात सातत्य असणे अत्यंत गरजेचे आहे. असे प्रतिपादन स्केटिंग कोच प्रशिक्षक समाजसेवक श्री सूर्यकांत हिंडलगेकर यांनी केले.
एंजल फाउंडेशन बेळगांव आणि डी मीडिया बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य खुल्या रांगोळी स्पर्धा आणि बक्षीस वितरण सोहळा बनशंकरी देवास्थन मंदिर भडकल गल्ली बेळगाव येथील सभागृहात रविवार दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी मोठ्या थाटात स्पर्धा संपन्न झाल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एंजल फाउंडेशन बेळगांव च्या अध्यक्षा समाजसेविका सौ.मीनाताई बेनके होत्या.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून स्केटिंग स्कोच प्रशिक्षक श्री. सूर्यकांत हिंडलगेकर , डी मीडियाचे सर्वेसर्वा आणि एंजल फाउंडेशनचे उपाध्यक्ष समाजसेवक श्री. दिपक सुतार,समाजसेवक कवी प्रा निलेश शिंदे, परीक्षक म्हणून बेळगांव येथील ज्येष्ठ चित्रकार व रांगोळी आर्टिस्ट श्री. अजित औरवाडकर आणि ज्येष्ठ चित्रकार व आर्टिस्ट श्री. चंद्रशेखर रांगणेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारत देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मामोहन सिंग यांना मौन पाळून भावपुर्ण श्रद्धांजली व आदरांजली वाहिली. यावेळी भव्य खुल्या रांगोळी स्पर्धेमध्ये कर्नाटक , महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून नमवांत जाणकार 100 कलावंत कलाकार महिला व पुरुष स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
यावेळी परिक्षक ज्येष्ठ चित्रकार व आर्टिस्ट अजित औरवाडकर आणि ज्येष्ठ चित्रकार व आर्टिस्ट श्री. चंद्रशेखर रांगणेकर, प्रा निलेश शिंदे, मीनाताई बेनके यांनी विचार मांडले. यावेळी विविध व्यवस्थापन कमिटीचे आणि विविध संस्थांचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी, विद्यार्थी पालक शिक्षक हितचिंतक स्पर्धेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* स्पर्धेचा निकाल *
1. प्रथम क्रमांक : मारूती जानबा आंबेवाडकर (बेळगाव, कर्नाटक )
2. द्वितीय क्रमांक : विलास रहाठे ( रत्नागिरी, महाराष्ट्र )
3. तृतीय क्रमांक : अक्षय वाहालकर ( रत्नागिरी महाराष्ट्र)