विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा योग्य सदुपयोग करावा- प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर
बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य विज्ञान, गृहविज्ञान आणि एम.कॉम.आणि एम.एस्सी. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या तर्फे व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा अत्यंत उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर यांनी भूषवले होते.
कार्यक्रमाची सुरुवात साक्षी पाटील यांच्या ईशस्तवनाने झाली. तद्नंतर भारता चौगुले यांनी सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांचे स्वागत केले.यावेळी विद्यार्थ्यांनी परंपरागत पद्धतीने सर्व शिक्षकांची आरती ओवाळून आशीर्वाद घेतला .यावेळी हर्षल धामणेकर, अक्षता, गौतमी कडोलकर, श्वेता निलजकर, मारुती के., सायमा सौदागर, सुष्मिता देशपांडे आणि दिनेश मोळेराखी यांनी गुरुवंदनाच्या निमित्ताने गुरु-शिष्य नाते आणि त्यांचे महत्त्व याविषयी आपले विचार मांडले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर म्हणाले की, प्राचीन गुरु-शिष्य परंपरेत बदल येत आहे. परंतु शिक्षक आपल्या सर्व शिष्यांना समानतेची वागणूक देऊन ज्ञानाजर्नाचे कार्य करत असतो. विद्यार्थ्यांनी गुरुने दिलेल्या ज्ञानाचा योग्य सदुपयोग करून आपले उत्तम भविष्य घडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.या कार्यक्रमाला सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संध्या तुर्वेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुष्मिता देशपांडे आणि भारता चौगुले यांनी केले.