“कॅम्पस ते कॉर्पोरेट” कार्यशाळेत विद्यार्थ्यांना उद्योगसज्जतेचे धडे
बेळगाव – डी.एम.एस. मंडळाच्या बी.बी.ए. महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी “कॅम्पस टू कॉर्पोरेट: नोकरीसाठी सज्ज होणे” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. गोव्यातील झुवारी ॲग्रो केमिकल्स लिमिटेडचे माजी उपाध्यक्ष (विधी) आणि कंपनी सेक्रेटरी आर. वाय. पाटील हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रा. अभय परमोजी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. प्रा. रुतिका लाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिल्यानंतर, आर. वाय. पाटील यांनी विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट जीवनात संक्रमणासाठी आवश्यक कौशल्ये आणि दृष्टीकोन यावर मार्गदर्शन केले.
ते म्हणाले की, “कॉर्पोरेट जगात केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नसते; प्रभावी संवादकौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता, बदलांना स्वीकारण्याची तयारी, टीमवर्क आणि सकारात्मक दृष्टिकोन ही यशाची गुरुकिल्ली ठरते. शैक्षणिक जीवनानंतर कार्यक्षेत्रात सतत शिकण्याची वृत्ती ठेवणे आणि स्वतःला विकसित करण्याची तयारी असणे गरजेचे आहे.”
अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील यांनी पदवीधरांनी नोकरीसाठी सिद्ध होण्याबरोबरच उद्योगांना आवश्यक असणाऱ्या कौशल्यांचा अंगीकार करणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.
श्री. प्रियांशु अग्रवाल यांनी आभार मानले, तर कुमारी अनन्या शिंदे हिने कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.