बेळगाव, ४ नोव्हेंबर २०२५ :
बेळगाव शहराच्या स्वच्छतेला नवा आयाम देण्यासाठी प्रभाग क्रमांक 29 चे नगरसेवक नितीन ना. जाधव यांनी एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. इंदौर हे सलग अनेक वर्षे देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाते. याच यशस्वी मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच सर्व नगरसेवकांनी इंदौर महापालिकेचा अभ्यास दौरा केला होता.
या अभ्यास दौऱ्यानंतर नगरसेवक नितीन जाधव यांनी इंदौरमधील “दोन पिशवी स्वच्छता प्रणाली” आपल्या वॉर्डात प्रथमच राबवली आहे.
स्वच्छता मित्र (पौर कर्मिक) रस्ते झाडल्यानंतर कचरा एका बाजूला गोळा केला जातो; परंतु वाऱ्यामुळे हा कचरा पुन्हा रस्त्यावर विखुरला जातो. या समस्येवर उपाय म्हणून स्वच्छता मित्रांना दोन स्वतंत्र पिशव्या देण्यात आल्या आहेत —
एका पिशवीत प्लॅस्टिक कचरा,
तर दुसऱ्यात सेंद्रिय व अन्य कचरा गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नगरसेवक जाधव यांनी स्वच्छता मित्रांशी थेट संवाद साधून आणि त्यांना विश्वासात घेऊन ही प्रणाली प्रभावीपणे अंमलात आणली आहे. या उपक्रमामुळे परिसरात स्वच्छता राखण्यास आणि कचरा वर्गीकरणास मोठा हातभार लागणार आहे.
नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले असून, अशा योजनांमुळे बेळगाव ‘स्वच्छ आणि स्मार्ट सिटी’ बनविण्याकडे आणखी एक पाऊल टाकत असल्याचे मत व्यक्त केले आहे.




















