आप्पाचीवाडी-कुरली हालसिध्दनाथ यात्रेला प्रारंभ
लाखो भाविकांची उपस्थिती :
कर्नाटक महाराष्ट्रासह अन्य राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आप्पाचीवाडी-कुर्ली तालुका निपाणी येथील हालसिद्धनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात झाली.
सकाळी कुरली तालुका निपाणी येथील हालसिद्धनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. मानकरी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आरती झाली. सवाद्य पालखी मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून घुमट मंदिर येथे आली. या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. वालंग झाला.
पालखी मिरवणूक वाडा मंदिर येथे आली. या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्यावर आप्पाचीवाडी व कुरली पालखी, अश्व, छत्र्या खडक मंदिर येथे आल्या. मंदिर प्रदक्षिणा (सबिना) संपन्न झाला. यावेळी उपस्थित भाविकांनी खारीक, खोबरे व भंडार्याची उधळण मोठ्या प्रमाणात केली. हालसिद्धनाथ महाराज की जय, चांगभलं व ढोलाच्या आवाजाने परिसर दणाणून गेला होता.
पालखी मिरवणूक मंदिरात आल्यावर उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना करून कर बांधण्यात आली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. प्रमुख मानकरी यांनी हेडाम खेळवले. वालंग संपन्न झाला.
यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
मराठी शाळेत हालसिद्धनाथ अन्नछत्र यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे. ग्रामपंचायतच्या वतीने भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय यासह अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरात खेळणी, पाळणे, नारळ, साखर, कापूर, हॉटेल, भेळ, आईस्क्रीम आधीसह अन्य दुकानाचे स्टॉल थाटण्यात आले आहेत.