बेळगाव:चालू वर्षी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे सुगी हंगामामध्ये अडथळा आला होता. त्यामुळे भात कापणी आणि भात बांधण्याची कामे ठप्प झाली होती. सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे भात कापणी आणि भात बांधणीच्या कामांना वेग आला आहे.
चालू वर्षी सरासरी पर्जन्यमान अधिक झाले. त्यामुळे भात पिके आडवी झाली होती. वारंवार पावसाचा अडथळा आल्यामुळे सुगी थांबली होती. सध्या काही दिवसापासून पाऊस नसल्यामुळे सुगी कामाला जोराने शेतकरीवर्ग लागल्याचे दिसत आहे.
तरीदेखील कामगारवर्ग मिळेनासा झाला आहे. ज्यादा मजुरी देऊन कामगार वर्ग आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न काही शेतकरी करताना दिसत आहेत. बेळगाव तालुक्यातील बहुतेक ठिकाणच्या भात पीक कापणी आणि बांधणीच्या कामांना जोरदार सुरुवात झाली आहे. येळूर , सुळगे , यरमाळ, धामणे, अवचारहट्टी , देसूर, वाघवडे , बस्तवाड, मच्छे, शहापूर , किनये , करले बहाद्दरवाडी, जानेवाडी, निलजी शिंदोळी गावांमध्ये कामांना वेग आला आहे.भात कापणीनंतर काही शेतकरी वर्ग भात मळणीच्या कामात व्यस्त झाल्याचे दिसत आहे. काही शेती शिवारामध्ये पाऊस जास्त झाल्यामुळे जमीन अजूनही ओलसर आहे.
त्यामुळे मळणी कामे लांबली आहेत. येत्या काही दिवसांमध्ये कापणी, बांधणीची कामे संपवून शेतकरी वर्ग मळणीमध्ये व्यस्त राहणार आहे. तसेच रब्बी पिकाच्या पेरणी हंगामामध्ये सुद्धा शेतकरीवर्ग व्यस्त दिसणार आहे. यावर्षी रब्बी पिकाचा हंगाम खूपच लांबला आहे . त्यामुळे रब्बी पिकाच्या काढणीचा हंगाम सुद्धा लांबणे साहजिक आहे. याचा विचार करून शेतकरी वर्ग मार्च , एप्रिलच्या अगोदर जी पिके घेता येतील अशीच पिके घेण्याचा विचार करत आहे. एकूणच भात कापणी आणि बांधणीच्या कामांना वेग आला आहे.