पोलीस प्रशासनातर्फे सामाजिक कार्यकर्ते साजिद शेख यांचा सन्मान
पोलीस खात्याला सहकार्य करत उल्लेखनीय समाजसेवा करणारे बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते साजिद शेख यांना बेळगाव पोलीस प्रशासनातर्फे नुकतेच सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
गोरगरीब असहाय्य लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते साजिद शेख यांची पावसाळ्यात रस्त्यावरील धोकादायक झाडे, झाडाच्या फांद्या हटवण्याच्या बाबतीतील तत्परता वाखाणण्याजोगी आहे. पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणासारखे उपक्रम राबवणाऱ्या साजिद यांनी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाला एक रुग्णवाहिका देखील देणगी दाखल दिली आहे. विविध नागरिक समस्या सोडवण्यात पोलीस प्रशासनाला त्यांचे वेळोवेळी सहकार्य लाभत असते.
या पद्धतीच्या उल्लेखनीय कार्याबद्दल बेळगाव शहर पोलीस प्रशासनातर्फे गुन्हा व वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त एन. निरंजन राज अर्स यांनी आपल्या कार्यालयात सन्मानपत्र देऊन साजिद शेख यांचा सत्कार केला. तसेच साजिद यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देताना यापुढेही पोलीस खात्याला आपले सहकार्य लाभो, अशी अपेक्षा व्यक्त केली.