बेळगांव:देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना राखी बांधून विद्यार्थिनी, तरुणी आणि महिला यांनी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत असा संदेश दिला.
मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटर येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
देशसेवेसाठी आपले घरदार सोडून सेवा बजावत असलेल्या प्रशिक्षणार्थी जवान, जवान आणि अधिकारी यांना राखी बांधून विद्यार्थिनी, तरुणी आणि महिला यांनी बहीण भावाच्या पवित्र नात्याचे दर्शन घडवले. दोनशेहून अधिक विद्यार्थिनी, विविध महिला संघटना आणि सैनिकांचे कुटुंबीय रक्षाबंधन कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारा रक्षाबंधन कार्यक्रम अविस्मरणीय असाच ठरला. राखी बांधून घेताना प्रशिक्षणार्थी अग्निवीर भावुक झाले होते.
मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडीयर जॉयदीप मुखर्जी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, जवान रक्षाबंधन कार्यक्रमात सहभागी झाले होते. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या रक्षाबंधन आणि अन्य सण मराठा सेंटरमध्ये दरवर्षी उत्साहाने साजरे करून विविधतेत एकतेचे दर्शन घडवले जाते.