अगसगे व मन्निकेरी गावात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव उत्साहात साजरा
बेळगाव : (शुक्रवार) कडोली जिल्हा पंचायत हद्दीतील अगसगे व मन्निकेरी गावामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. गावातील मंदिरे व परिसर आकर्षक फुलांच्या तोरणांनी सजवण्यात आला होता.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लोकोपयोगी खात्याचे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. सतीश जारकिहोळी यांचे अप्त सहाय्यक मलगौडा पाटील यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाच्या फोटोचे पूजन करण्यात आले. पूजनानंतर त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनमूल्यांचा उल्लेख करून समाजातील सद्भावना, ऐक्य आणि प्रगतीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी युवकांनी धर्म, संस्कृती व परंपरा जपून समाजकार्यात पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
उत्सवाच्या निमित्ताने ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, श्रीकृष्ण युवक मंडळाचे कार्यकर्ते तसेच गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिगीत, भजन, कीर्तन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण दुमदुमून गेले.
गावातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत सजवलेल्या गोपालकाला व दहीहंडी स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मुलांनी श्रीकृष्ण, राधा व गोपिकांचे वेश परिधान करून सादर केलेल्या नृत्य-नाट्याला विशेष दाद मिळाली.
या निमित्ताने गावात ऐक्य, भक्ती आणि उत्साहाचे दर्शन घडले. सर्वांनी मिळून उत्सवाला सामुदायिक सणाचे स्वरूप दिले.