बेळगाव-” विद्यार्थ्यांना घडविण्याची, त्यांच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी फक्त शिक्षकांची नसून पालकांनीही लक्ष घातले तर निश्चितच विद्यार्थी अधिक संस्कारक्षम होऊ शकतील” असे विचार सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष व पायोनियर अर्बन बँकेचे संचालक अनंत लाड यांनी बोलताना व्यक्त केले.
बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या विठ्ठलाचार्य शिवनगी प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण समारंभ गुरुवारी शाळेच्या सभागृहात संपन्न झाला . त्याप्रसंगी अनंत लाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर कुलकर्णी हे होते तर अतिथी म्हणून गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन सुहास सांगलीकर व बीसीए प्रोग्रॅमच्या कॉर्डिनेटर अस्मिता देशपांडे या उपस्थित होत्या.
पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती व नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पाहुण्यांचा परिचय शिक्षक वर्गाने केल्यानंतर पाहुण्यांचे स्वागत व सन्मान मुख्याध्यापिका मीनाक्षी वडेर यांनी केले.
गेल्या वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धातील विजेत्यांचा पाहुण्यांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
अनंत लाड यांनी पालकांना उद्देशून बहुमोल मार्गदर्शन केले. तर “2047 चा भारत घडविण्याची जबाबदारी युवा पिढीच्या हातात आहे” असे मत अस्मिता देशपांडे यांनी व्यक्त केले.
विद्यार्थिनींनी तयार केलेल्या विविध विषयावरील कलाकृतींचे प्रदर्शन तसेच रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनाचे उद्घाटन अनंत लाड यांनी फीत सोडून केले.
यावेळी आदर्श शिक्षिका म्हणून सीमा कोठरे, सुवर्ण कुलकर्णी, भारती जोशी व स्नेहल कुलकर्णी यांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून साक्षी बडमंजी (मराठी माध्यम) व हर्षिता नंदी (कन्नड माध्यम) यांना सन्मानित करण्यात आले. तसेच जयश्री मुचंडीकर व सिंधू गौंडाडकर यांना मराठी व कन्नड माध्यमाच्या बेस्ट चॅम्पियन म्हणून निवडण्यात आल्या. यावेळी बोलताना सुधीर कुलकर्णी यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा जोशी यांनी तर आभार प्रदर्शन सीमा कोठरे यांनी केले. कार्यक्रमास मराठी व कन्नड माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.