दुग्धाभिषेक सोहळा यशस्वी करण्याचा शहापूर समितीचा निर्धार
महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित येळूर राजहंस गडावरील हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा भव्य दुग्धाभिषेक सोहळ्यास प्रचंड संख्येने हजेरी लावून सोहळा यशस्वी करण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर विभागाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
म. ए. समिती शहापूर विभागाचे अध्यक्ष शांताराम मजुकर यांच्या अध्यक्षतेखाली काल सोमवारी गंगापूरी मठ, कोरे गल्ली येथे शहापूर विभाग म. ए. समितीची बैठक पार पडली. याप्रसंगी व्यासपीठावर समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर, नगरसेवक रवी साळुंखे, समितीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, महादेव पाटील, आदी उपस्थित होते. सदर बैठकीत बोलताना रमाकांत कोंडुसकर यांनी राजहंसगडावरील शिवछत्रपतींच्या पुतळ्याचा भव्य दुग्धाभिषेक सोहळा कोणत्या उद्देशाने आयोजित केला आहे याची माहिती दिली. राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी फक्त आपल्या स्वार्थासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आणि भगव्याचा वापर करतात. विशेष करून निवडणुका जवळ आल्या की त्यांचे शिवप्रेम ओतू जात असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे मराठा समाज आणि मराठी भाषिकांनी आता सावध होऊन एकत्रित येण्याद्वारे आपली संघटित ताकद दाखवणे काळाची गरज बनली आहे. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुग्धाभिषेक सोहळा हा त्यांच्यावरील आमच्या अपार श्रद्धा भक्तीपोटी तर आहेच, शिवाय मराठा समाज मराठी भाषिक आणि समस्त शिवभक्तांना संघटित करणे हा देखील या सोहळ्यामागचा उद्देश आहे असे सांगून राजहंस गडावरील सोहळ्याला सर्वांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रमाकांत कोंडुसकर यांनी केले
यावेळी नगरसेवक रवी साळुंखे, महादेव पाटील, शांताराम मजुकर, सागर पाटील, गजानन शहापूरकर, अभिजीत मजुकर, माजी नगरसेवक राजू बिर्जे, प्रशांत भातकांडे आदींनी आपले विचार व्यक्त केले. बैठकीस सतीश गावडोजी, गजानन शिगुरकर, रमेश चौगुले, संभाजी शिंदे, सुधीर काळकुंद्रीकर, शुभम पाटील, मनोहर जाधव, उदय पाटील, राजेंद्र गावडोजी, शिवम गंधवाले, परशराम कुंडेकर, नागेश शिंदे, नागेश कुंडेकर, भाऊ मजुकर, राजाराम मजुकर, राजकुमार बोकडे, प्रभाकर पाटील, रवी जाधव, परशराम शिंदोळकर, रणजीत हावळाणाचे, शिवाजी उचगांवकर, सुनील बोकडे, बाळू कुरळे, पुंडलिक मंडोळकर, अभिजीत पुजारी, दिनेश कदम आदी बहुसंख्य कार्यकर्ते आणि शहापूर विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी शिवछत्रपतींचा दुग्धाभिषेक सोहळ्यास प्रचंड संख्येने उपस्थित राहून तो यशस्वी करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. बैठकीचे सूत्रसंचालन शिवाजी हावळाणाचे यांनी केले.