लोंढा-वास्को रेल्वे मार्गावरील दूधसागर ते सोनवणेच्या मध्ये मालवाहू रेल्वेचे सतरा डबे घसरले .आहेत. या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र रेल्वे मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.
दूधसागर ते सोनवणे या मार्गावरील पंधरा नंबर बोगद्याजवळ ही दुर्घटना घडली. वास्को येथून तोरंगळ होस्पेट येथील जिंदाल कंपनीला कोळसा घेऊन निघालेल्या मालवाहू रेल्वेचे डबे घसरले. त्यामुळे या मार्गावरील सर्व रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. मालवाहू रेल्वेचे डबे घसरल्याने येथील रेल्वे रुळाचे देखील नुकसान झाले आहे.
मालवाहू रेल्वे घसरल्याने या मार्गावरून धावणारी गोवा तिरुपती ही ट्रेन रद्द करण्यात आली असून, सायंकाळी जाणारी गोवा एक्सप्रेस ही अन्य ठिकाणाहून वळवण्यात आली. शनिवारच्या वास्को द गामा ते यशवांतपुर आणि यशवंतपुर ते वास्को द गामा या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.शनिवारची वास्को द गामा ते हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस मडगाव,रोहा,पनवेल,कल्याण,पुणे मार्गे वळवण्यात आली आहे.शनिवारची हजरत निजामुद्दीन ते वास्को द गामा एक्स्प्रेस पुणे,कल्याण, पनवेल,रोहा,मडगाव मार्गे वळवण्यात आली आहे.
रेल्वे विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मालवाहू डबे हटवून रेल्वे मार्ग पूर्ववत करण्याचे काम सायंकाळ पर्यंत सुरू होते.