बेळगाव: येथील श्री सरस्वती वाचनालय शहापूर वाचनालयाच्या शतक महोत्सव सुवर्ण वर्षानिमित्त कुमार गंधर्व संगीत संमेलना अंतर्गत संगीत शाकुंतल या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरूपा इनामदार यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी दिली. यावेळी कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर उपस्थित होते.
मंगळवार दि.15 ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता लोकमान्य रंगमंदिर , बेळगाव येथे या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रयोगाचे आयोजन करण्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अण्णासाहेब किर्लोस्करांच्या या नाटकाचा पहिला प्रयोग बेळगावमध्ये सरस्वती वाचनालयाच्या याच जागेत झाला होता. त्यानिमित्त वाचनालयाच्या वतीने दीडशे वर्षानंतर हा नाट्यप्रयोग पुन्हा करण्याचे ठरवण्यात आले आहे.
या नाट्यप्रयोगामध्ये बेळगाव मधील नवोदित कलाकारांचा सहभाग आहे हे विशेष.
वाचनालयाच्या वाटचालीबाबत अधिक माहिती देताना स्वरूपा इनामदार म्हणाल्या, 2024 हे वर्ष वाचनालयाच्या वतीने शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. श्री सरस्वती वाचनालय शहापूर, बेळगाव ही संस्था दीडशे वर्ष जुनी असून ती सतत ज्ञानदानाचे कार्य करत आली आहे. सरंजामे या प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी 1874 यावर्षी वाचनालय सुरू केले होते. कै.अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलेल्या संगीत शाकुंतल या नाटकाचा सर्वात पहिला प्रयोग 4 सप्टेंबर 1875 रोजी वाचनालयाच्या याच जागेत झाला होता. 1934 पासून वाचनालयामध्ये कन्नड, मराठी, हिंदी ,इंग्रजी ,संस्कृत ,उर्दू या ग्रंथांचे भांडार निर्माण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
वाचनालयमध्ये अनेक दुर्मिळ ग्रंथांचा संग्रह आहे. त्यामध्ये काही हस्तलिखिते देखील आहेत. सुमारे 40,000 वर अधिक पुस्तके आहेत म्हणून वाचनालयाला अत्युत्तम वाचनालय म्हणून कर्नाटक सरकारकडून पुरस्कारा प्राप्त झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. दरवर्षी वाचनालयामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृती व्याख्यानमाला, यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमाला, जगतज्योती श्री बसवेश्वर जयंती निमित्त व्याख्यानमाला आयोजित करण्यात येतात. वाचनालयमध्ये अभ्यासासाठी शेकडो विद्यार्थी येतात. तसेच योगाभ्यासाचे प्रशिक्षण केंद्र सुरु आहे .2024 वर्षांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत असे त्यांनी सांगितले.