संगम गल्ली रहिवासांनी आमदार राजू शेठ यांचे मानले आभार
बेळगाव:उत्तर मतदारसंघातील शाहूनगर परिसरातील संगम गल्ली मातोश्री कॉलनीमध्ये गेल्या २५ वर्षांपासून रहिवाशांना मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत होते. रस्ते, गटार आणि पाण्याच्या व्यवस्थेचा प्रश्न येथील नागरिकांना दीर्घकाळापासून पडला होता. या समस्येचे निराकरण करण्यासाठी काँग्रेस नेते संदेश राजमाने यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक रहिवाशांनी बेळगाव उत्तरचे लोकप्रिय आमदार असिफ राजू शेठ यांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्यांविषयी माहिती दिली.
या भेटीदरम्यान आमदार शेठ यांनी या भागाची पाहणी करून लवकरच समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या या आश्वासनाला पायबंद मिळाला असून, आता या ठिकाणी गटारी बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच, २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाइनचे कामही सुरू करण्यात आले आहे. रस्त्याच्या कामाचीही सुरुवात झाली असून, लवकरच ते पूर्ण होणार आहे.
या सर्व विकासकामांमुळे आता मातोश्री कॉलनीतील रहिवासी आनंदी आहेत. त्यांनी आमदार असिफ राजू शेठ यांचे समस्येकडे लक्ष वेधून घेण्याबद्दल आणि त्यांच्या आश्वासनाप्रमाणे कामे सुरू करण्याबद्दल आभार मानले आहेत. रहिवाशांच्या मते, “२५ वर्षांनंतर आमच्या वस्तीत मूलभूत सुविधा येणे हा आमच्या आयुष्यातील एक मोठा बदल आहे. आमदार शेठ यांनी आमच्या समस्येकडे लक्ष दिले, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.”