सोसायटी संचालकांची वसुलीसाठी धावपळ
बेळगाव प्रतिनिधी:
मार्च महिना सुरू होताच विविध को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालक वर्गाची कर्ज वसुलीसाठी धावपळ सुरू होते. तालुक्यातील काही को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालक मंडळाची कर्ज वसुलीसाठी सकाळपासून धावपळ सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
बेळगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर को-ऑपरेटिव्ह सोसायटी कार्यरत आहेत. या सोसायटयाकडून ग्राहकांना विविध प्रकारची कर्जे उपलब्ध करून दिली जातात. यामध्ये वैयक्तिक कर्ज, वाहन तारण कर्ज, सोने तारण कर्ज, गृह कर्ज अशी विविध कर्जे दिली जातात. कर्ज देण्यापूर्वी सोसायटी संचालकाकडून कर्जदाराची सर्व प्रकारे शहानिशा केली जाते. त्यानंतरच कर्ज दिले जाते. मात्र काही कर्जदारांना वेळेत कर्जाचे हप्ते परतफेड करता येत नाहीत. अशा थकीत कर्जदारांच्या पाठीमागे सोसायटी संचालकांचा कर्ज वसुलीचा तगादा लागलेला असतो.
वसुलीसाठी गेल्यानंतर कर्जदार संचालकांना भेटत नाहीत. त्यामुळेच भल्या पहाटेच संचालक मंडळ कर्जदाराच्या घरी भेट देऊन त्याला थकीत कर्ज भरण्यासाठी दम देत आहेत. त्यामुळे काही वेळेला संचालक मंडळ आणि कर्जदार यांच्यामध्ये वाद-विवाद होत असल्याचेही दिसून येत आहे. यापूर्वीही अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. शक्यतो मार्च अखेरपर्यंत जास्तीत जास्त कर्ज वसुली करून होईल तितका जास्त नफा मिळवण्याचा संचालक मंडळाचा उद्देश असतो. पण संचालक मंडळाच्या या उद्देशाला काही कर्जदाराकडून चांगला प्रतिसाद मिळत नाही.