“रोहिणी पाटील यांची आशियाई ज्युनियर जूडो अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड”
बेळगाव :
कर्नाटकातील युवक सशक्तीकरण आणि क्रीडा विभागात (DYES) जूडो प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रोहिणी पाटील यांची जकार्ता, इंडोनेशिया येथे 10 ते 15 सप्टेंबर 2025 दरम्यान होणाऱ्या ज्युनियर आशियाई जूडो अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय ज्युनियर जूडो संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती जूडो फेडरेशन ऑफ इंडिया यांनी स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया व भारत सरकारच्या सहकार्याने केली आहे.
रोहिणी पाटील 2024 पासून भारतीय जूडो संघासोबत सातत्याने कार्यरत असून त्यांनी याआधी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रशिक्षक म्हणून योगदान दिले आहे. त्यामध्ये –
सिनियर आशियाई जूडो ओपन अजिंक्यपद स्पर्धा 2024 (अक्तौ, कझाकिस्तान)
सिनियर आशियाई जूडो ओपन अजिंक्यपद स्पर्धा 2024 (हॉंगकॉंग, चीन)
ज्युनियर आशियाई जूडो कप 2025 (तैवान)
यानंतर आता त्या इंडोनेशियामध्ये होणाऱ्या ज्युनियर आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाला मार्गदर्शन करणार आहेत.
दोन दशकांचा प्रवास
रोहिणी पाटील यांनी 2003 मध्ये जूडो क्षेत्रात पदार्पण केले. तब्बल 22 वर्षांच्या या प्रवासात त्यांनी खेळाडू म्हणून आणि प्रशिक्षक म्हणून अनेक महत्त्वाची यशं संपादन केली आहेत.
दक्षिण आशियाई जूडो अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, सिनियर व ज्युनियर नॅशनल स्पर्धांमध्ये सुवर्णपदकं
राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अनेकवेळा विजेतेपद
प्रतिष्ठेचा ‘एकलव्य पुरस्कार’
2nd Dan ब्लॅक बेल्ट (भारतीय जूडो फेडरेशन आयोजित परीक्षेत प्रथम क्रमांक)
‘A’ ग्रेड राष्ट्रीय पंच प्रमाणपत्र
प्रशिक्षक म्हणून वाटचाल
2019 मध्ये NIS डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी प्रशिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. सध्या त्या बेळगाव येथील DYES इनडोअर हॉलमध्ये अनेक तरुण खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी तयार करत आहेत. या कार्याला DYES चे उपसंचालक श्रीनिवास बी. यांचा सक्रिय पाठिंबा मिळत आहे.
रोहिणी पाटील यांच्या या यशामुळे बेळगाव आणि कर्नाटक क्रीडा क्षेत्राला मोठा गौरव मिळाला आहे.