बेळगाव:मागील आठ दिवसापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे भात पिकाला जबर फटका बसला आहे. पिके भुईसपाट झाली असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
चालू वर्षी सरासरी पर्जन्यमान जास्त झाल्यामुळे शेतीवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. भात कापणी म्हणजेच सुगीची कामे सुरू होण्याच्या वेळीच पावसाने धिंगाणा घातल्यामुळे उभे भात पीक आडवे झाले आहे. संपूर्ण भात पीक पाण्यात पडल्यामुळे भात पीक खराब होत आहे. तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये भात पीक पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अरे पावसा, पावसा घालू नको असा धिंगाणा अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
बेळगाव तालुक्यातील yellur येलूर या गावांमधील सर्वच शेतकरी बासुमती भात पीक घेतात. पण परतीच्या पावसाने धिंगाणा घातल्यामुळे भात पीक आडवे झाले आहे. यावर्षी भात पेरणीनंतर बऱ्यापैकी पावसाने हंगाम दिला होता . त्यामुळे भात पीक चांगले आले होते. यावर्षी भात पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होणार असा अंदाज शेतकरी वर्ग बांधत होता. मात्र परतीच्या पावसाने एकच धिंगाणा घातल्यामुळे सर्व आशेवर पाणी पडले आहे. आता पाऊस कधी एकदा पूर्णपणे उघडीप देतो आणि सुगी हंगामाला सुरुवात होते याकडे शेतकरी वर्गाच्या नजरा लागल्या आहेत. मात्र न चुकता दररोज पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ होत आहे. यावर्षी भात पिकाच्या उत्पादनामध्ये घट होणार हे निश्चित आहे.