संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या शिवसेनेच्या ६८ शिवसैनिकांना बेळगावत शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आदरांजली वाहण्यात आली.
सम्राट अशोक चौक येथे आयोजित हुतात्मा अभिवादन कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे उपस्थित होते.यावेळी विजय देवणे आणि अन्य उपस्थितनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र आणि हार अर्पण करून आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. सीमाप्रश्नाच्या बाबत महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी चलो मुंबई रॅली काढूया. कोल्हापूर येथून रॅली काढून मुंबईला जाताना वाटेतील गावातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊया. नंतर मुंबईत रॅली पोचल्यावर तेथे धरणे आंदोलन छेडूया. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बैठक घेऊन चलो मुंबई कार्यक्रम निश्चित केल्यास सगळी जबाबदारी उबाठा शिवसेना घेईल असे आश्वासन कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे यांनी हुतात्म्याना आदरांजली वाहताना दिले.
यावेळी हुतात्मा अमर रहे, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर, संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी, समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, शुभम शेळके यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.