*बुधवार दिनांक 30 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने जिल्हा शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.*
सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी बि.के. मॉडेल शाळा बेळगाव येथे शैक्षणिक विभागाकडून तालुकास्तरीय प्रतिभा कारंजी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेमध्ये मराठी माध्यमात शिकणाऱ्या इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांने सहभाग घेतला होता. शालेय आणि केंद्रस्तरावर त्याने पहिला क्रमांक पटकावला होता, तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये किती चिट्ठी काढून एका विषयावर व्यक्त होण्याच्या प्रकारात ज्यावेळी हा विद्यार्थी मराठी भाषेमध्ये व्यक्त होऊ लागला त्यावेळी परीक्षकांनी त्याला आक्षेप घेऊन या स्पर्धेत फक्त कन्नड भाषेमध्येच व्यक्त होता येते असे सांगून त्या विद्यार्थ्याला स्पर्धेमधून बाद ठरविले.
त्यामुळे मराठी भाषिक विद्यार्थ्यावर अन्याय झाला असून अशा पद्धतीने कोवळ्या वयातील विद्यार्थ्यांवर भाषिक सक्ती केल्यामुळे त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होऊन भविष्यात जिल्हा, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत भाग घेण्यास सक्षम होण्यास अडचणी येऊ शकतात.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिकण्याचा आणि व्यक्त होण्याचा अधिकार आहे, त्यामुळे इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्याला अशी सक्ती करणे आणि त्याला स्पर्धेतून बाद करणे अन्यायकारक आहे, तेव्हा मराठी भाषिक विद्यार्थ्यांना मिळणारी ही वागणूक आणि भाषिकसक्ती दूर करावी, मराठी भाषिक विद्यार्थ्यांना प्रतिभा कारंजी स्पर्धा किंवा इतर तत्सम स्पर्धेत भाग घेताना तालुका किंवा जिल्हास्तरावर मराठीत तथा मातृभाषेत व्यक्त होण्यास मुभा द्यावी, तसेच बी.के. मॉडेल शाळा येथे झालेल्या स्पर्धेची चौकशी करून जे परीक्षक होते ज्यांनी विद्यार्थ्यावर अन्याय केला त्यांच्यावर कारवाई करावी व सदर स्पर्धा पुन्हा घेण्यात याव्यात आणि अन्याय झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशा आशयाचे निवेदन जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती लीलावती हिरेमठ यांना सादर करण्यात आले.
यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती लीलावती हिरेमठ यांनी निवेदन स्वीकारून सदर प्रकरणाची चौकशी करत स्पर्धेचे निकष तपासले जातील आणि त्यामध्ये योग्य ते बदल करत मराठी भाषिक विद्यार्थ्यांना भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, गुंडू कदम, सरचिटणीस श्रीकांत कदम, सुरज कुडूचकर आदी उपस्थित होते.
D Media 24 > Local News > *युवा समितीच्या वतीने जिल्हा शिक्षणाधिकारी यांना निवेदन*
*युवा समितीच्या वतीने जिल्हा शिक्षणाधिकारी यांना निवेदन*
Deepak Sutar30/10/2024
posted on
Leave a reply