प्रादेशिक आयुक्त एम.जी. हिरेमठ यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
बेळगावच्या जिल्हाधिकारीपदी काम पाहिलेले आणि सध्या प्रादेशिक आयुक्त म्हणून सेवा बजावत असलेले एम. जी. हिरेमठ यांच्या सेवानिवृत्तीबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा पंचायत सभागृहात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना एम. जी. हिरेमठ म्हणाले, शासकीय सेवा म्हणजे आपल्यासाठी देवाचा आशीर्वाद आहे. प्रामाणिकपणा, सकारात्मक दृष्टीकोन आणि लोकांचे भले करण्याची जिद्द असेल तर यश, प्रसिद्धी आणि समाधान हे पद कोणतेही असो आपल्या पाठीशी असते, असे मत त्यांनी व्यक्त केले.आपल्या जिल्ह्यात प्रशासनाने आपल्याला सेवानिवृत्तीची संधी दिली त्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले. यावेळी जिल्हाधिकारीपदी कार्यरत असताना आपण केलेल्या कार्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, बेळगावच्या मातीचे सुपुत्र असलेले एम.जी. हिरेमठ यांनी जिल्हा आयुक्त या नात्याने येथील शेतकऱ्यांच्या समस्यांना तत्परतेने प्रतिसाद देण्याचे काम केले आहे. नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन असणारी व्यक्ती सर्व अधिकाऱ्यांसाठी आदर्श असते. पूर आणि कोविडच्या काळात एम. जी. हिरेमठ यांनी अत्यंत कार्यक्षमतेने काम करून जिल्ह्यातील जनतेचा आणि शासनाचा गौरव केला असल्याचे ते म्हणाले.
यावेळी विजापूरचे जिल्हाधिकारी विजय महांतेश दनम्मानवर, जमखंडी उपविभागीय अधिकारी संतोष कामगौडा, राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलपती प्रा.रामचंद्र गौडा, सय्यदा आफरीन बानू बेल्लारी, दलित नेते मल्लेश चौगुले, बागलकोटचे जिल्हाधिकारी सुनील कुमार, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, धारवाडचे उपविभागीय अधिकारी अशोक तेली, चिक्कोडीचे उपविभागीय अधिकारी माधव गीते आदींची भाषणे झाली.
यावेळी तनुजा हिरेमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.संजीव पाटील, अपर जिल्हाधिकारी के.टी.शांतला, चिक्कोडी उपविभागीय अधिकारी माधव गीते,अतिरिक्त प्रादेशिक आयुक्त नजमा पीरजादे , सुनीता देसाई आदी उपस्थित होते.