*सीमाप्रश्न आणि सीमावासियावर होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडा*
*महाराष्ट्र एकीकरण समितीची नितीन बानुगडे पाटील यांच्याकडे मागणी*
१४ ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमानिमित्त बेळगावात आलेले *शिवसेना* (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते प्रा. श्री. नितीन बानगुडे-पाटील यांची भेट घेऊन त्यांना सीमाप्रश्नी निवेदन देऊन महाराष्ट्र एकीकरण समितीने मागणी केली.
निवेदनात असे म्हटले आहे की,
आम्ही सिमावासीय गेली ७० वर्षे भाषिक पारतंत्र्यात आहोत हे आपणास माहीत आहेच, आपणही या मराठी माणसावर होणाऱ्या अत्त्याचाराचा अनुभव घेतलेला आहेच, यासंदर्भात आपणावर खानापूर न्यायालयात त्याबद्दल खटला चालू आहे. असेच अन्याय येथील मराठी भाषिकांवर वारंवार होत असून याला वाचा फुटावी व हा प्रश्न लवकर सुटावा, म्हणून आम्ही ९ ऑगस्ट २०२१ क्रांतीदिनी सिमावासीयांतर्फे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडवावा, म्हणून लाखो पत्रे पाठविली, तसेच गेल्या लोकसभा निवडणुकी पूर्वी येथील भाषिक सक्ती विरोधात १०१ पत्रे देशाच्या गृहमंत्रालयाला पाठविली, त्याच बरोबर महाराष्ट्र एकीकरण समितीने वारंवार नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन व पत्रव्यवहार करून हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा यासाठी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. पण यापूर्वीच्या काँग्रेससह सद्याच्या केंद्रातील भाजप सरकारनेही अजून याची दखल घेतली नाही. महाराष्ट्रातील भाजप प्रणित महायुती सरकारनेही याकडे दुर्लक्ष केलेले दिसत आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातही खटल्यालाही गती मिळेनाशी झालेली आहे,
आपण *शिवसेना* (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य नेते,प्रवक्ते व स्टार प्रचारक असल्याने महाराष्ट्रातील येत्या विधानसभा निवडणुकीत प्रचारा दरम्यान जाहीर सभेत आपल्या भाषणात सीमावसियावरील अन्याय व सीमाप्रश्नाची सोडवणूक हा मुद्दा प्रकर्षाने मांडावा व पुन्हा या प्रश्नांला उजाळा देऊन पुढील काळात तो सोडवण्यासाठी प्रयत्न करावा, ही आम्हां सीमावसियातर्फे कळकळीची विनंती.
अशी मागणी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, रोहन लंगरकांडे शिवाजी मेणसे यांनी केली आहे,
यावेळी शहर समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, युवा नेते सागर पाटील हे उपस्थित होते.