कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या गोडची येथील श्री विरभद्रेश्र्वर यात्रेचा रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.
बेळगाव जिल्ह्यातील रामदूर्ग तालुक्यातील गोडची येथील श्री विरभद्रेश्र्वर यात्रेला प्रारंभ झाला आहे.विविध ठिकाणाहून आलेले वाद्य मेळे,धनगरी ढोल पथक या बरोबरच हातात तलवारी घेऊन वीर रुपात भक्त रथोत्सवात सहभागी झाले होते . रथोत्सवाच्या मार्गावर भक्तांचा अलोट जनसागर लोटला होता.रथ जात असताना रथावर खोबरे,खारीक यांची भक्तांकडून उधळण केली जात होती. चार मजली रथाची आकर्षक सजावट करून त्यामध्ये उत्सव मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली होती.
हर हर महादेव चा जयघोष रथोत्सवात सहभागी झालेले भाविक करत होते.रथोत्सव वात सहभागी झालेला गजराज देखील भक्तांचे आकर्षण ठरला.सोंड उंचावून नमस्कार करून आणि मागील दोन पायावर उभे राहून गजराज अभिवादन करत होता.हजारो भक्तांच्या साठी मंदिरातर्फे उपाहार आणि चहाची व्यवस्था करण्यात आली होती.