तुडयेच्या रामलिंग हायस्कूल व ज्युनियर कॉलेजतर्फे जवानांसोबत राखीबंधन
बेळगाव :
तुडये येथील रामलिंग हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांनी या वर्षीचा रक्षाबंधन सण विशेष पद्धतीने साजरा केला. विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेल्या राख्या घेऊन त्यांनी थेट मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटर, बेळगाव येथे भेट दिली आणि तेथील जवानांच्या मनगटावर राख्या बांधल्या.
या उपक्रमासाठी सुभेदार मेजर नारायण स्वामी आणि सुभेदार शाहू पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य आर. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी आर. झेड. पाटील, पी. व्ही. नाकाडी, पी. व्ही. पवार, टी. व्ही. सावंत, एम. आर. वाडीकर, एस. एस. पाटील यांसह प्राध्यापक व प्राध्यापिका उपस्थित होते.
जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी देशरक्षणासाठी प्राणपणाने कार्य करणाऱ्या भारतीय लष्कराला अभिवादन केले. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना मराठा इन्फंट्री बटालियनचा परिसर व विविध शस्त्रास्त्रांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी आर. झेड. पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.