बेळगाव शहर पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्ब्यांग यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्याची शक्यता असलेल्या पाच ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.जमावबंदी आदेश लागू केलेला असला तरी कोणत्याही परिस्थितीत महामेळावा घेणारच असा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी व्यक्त केला .
धर्मवीर संभाजी चौक येथे सोमवारी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होणार आहे.या पार्श्वभूमीवर पोलीस खात्याने धास्ती घेऊन शहरातील धर्मवीर संभाजी चौक,छञपती संभाजी उद्यान,छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, लेले ग्राउंड, व्हॅक्सीन डेपो अशा पाच ठिकाणी पोलीस आयुक्तांनी जमाव बंदीचा आदेश लागू केला आहे.पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यावर बंदी घातली आहे. माजी आमदार मनोहर किणेकर,समिती नेते आर.एम.चौगुले ,शुभम शेळके आणि कार्यकर्त्यांनी व्हॅक्सीन डेपो येथेही भेट देऊन पाहणी केली.जमाव बंदी आदेश लागू केलेल्या पाच ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्रात जाण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत.महाराष्ट्रात गेल्यावरच हे आंदोलन बंद होईल.यापूर्वी देखील अनेकदा पोलीस खात्याने दबाव तंत्र वापरून आंदोलनाला आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला पण त्याला मराठी माणसाने दाद दिली नाही.कोणत्याही परिस्थितीत सोमवारी आम्ही महामेळावा करणार असा दृढ निश्चय समिती नेते आर.एम.चौगुले यांनी व्यक्त केला.