गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस खाते सज्ज
गुरुवारी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस खाते सज्ज झाले असून मिरवणुकीच्या मार्गावरून पोलिसांनी पथ संचलन केले.
पथ संचलनात पोलीस आयुक्तांच्यासह सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी झाले होते.राणी कित्तूर चन्नमा चौकातून पथ संचलनाला प्रारंभ झाला.कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांची गय नाही असा इशारा पोलीस खात्याने पथ संचलनातून दिला.विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी चार हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे.
संवेदनशील भागात सी सी टी व्हि कॅमेरे, ड्रोण द्वारे नजर ठेवली जाणार आहे.बंगलोर,धारवाड, गदग आदी विविध ठिकाणाहून पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी दाखल झाले आहेत.जलद कृती दलाची तुकडी देखील बेळगावात दाखल झाली आहे.याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या,जिल्हा सशस्त्र पोलीस दलाच्या तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.संवेदनशील भागात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.