गोळीबार प्रकरणी पोलिसांनी केले तिघांना अटक
श्री राम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकीतकर यांच्यावर शनिवारी सायंकाळी झालेल्या गोळीबार प्रकरणी बेळगाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.चोवीस तासाच्या आत गोळीबार प्रकरणातील व्यक्तींना जेरबंद करण्यात बेळगाव पोलीस यशस्वी झाले आहेत.बेळगाव पोलीस आयुक्त डॉ. एम.बी.बोरलिंगय्या यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अभिजित भातकांडे,राहुल कोडचवाड आणि ज्योतिबा मुतगेकर अशी पोलिसांनी गोळीबार प्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत.गोळीबाराच्या मागे अभिजित भातकांडे आणि रवी कोकीतकर यांच्यातील जुने वैमनस्य आणि आर्थिक व्यवहार कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.रवी कोकित कर यांनी गोळीबार प्रकरणी कॅम्प पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.