पुणे बंगलोर महामार्गांवर पेट्रोल वाहतूक करणारा टँकर उलटून हजारो लिटर पेट्रोल रस्त्यावर वाहून गेले. पोलीस आणि अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
बेळगाव जवळील देसूर येथील डेपोतून पेट्रोल घेऊन टँकर बैलहोंगल येथे निघाला होता.हलगा येथे पोचल्यावर टँकर चालकाचे वाहनाच्या वरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगातील टँकर उलटल्याने त्यातील पेट्रोल रस्त्यावर वाहू लागले. पेट्रोल टँकर उलटल्याचे कळताच लोकांनी कॅन आणि अन्य प्लास्टिक डबे घेऊन पेट्रोल गोळा करण्यासाठी धाव घेतली. काही लोकांनी पेट्रोल गोळा करून नेले पण घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस आणि अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांनी पेट्रोल गोळा करून नेणे धोकादायक असून अनर्थ घडू शकतो याची लोकांना जाणीव करून देऊन तेथून हटवले.
नंतर अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांनी रसायनाचा फवारा मारून कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेतली. टँकर उलटल्यामुळे महामार्गवरील एका बाजूची वाहतूक बंद करून वाहतूक सर्व्हिस रस्त्यावरून वळवण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार टँकर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे कळते. बागेवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मारब्यांग यांनी घटनास्थळी भेट देऊन अग्निशमक दलाच्या जवानांचे आणि पोलिसांचे परिस्थिती सुरळीत हाताळल्या बद्दल अभिनंदन केले.