सोने खरेदीला लोकांनी केली गर्दी
गुढी पाडव्याच्या दिवशी सोन्याचा भाव वधारला असून देखील सोने,चांदी खरेदी करण्यासाठी लोकांनी सराफी दुकानात गर्दी केली होती. साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या गुढी पाडव्याचा मुहूर्त साधून लोकांनी खरेदी केली.गुढी पाडव्याच्या दिवशी बेळगावात सोन्याचा भाव दहा ग्रॅमला ६१२०० रू तर चांदीचा भाव किलोला ७४००० रू इतका होता.सकाळपासून लोकांनी चोख सोने,चांदी आणि दागिने खरेदी करण्यासाठी पेढ्यात गर्दी केली होती.
गुढी पाडव्याच्या दिवशी चोख सोने खरेदी करण्यापेक्षा तयार सोन्याचे दागिने खरेदी करण्याकडे लोकांचा कल असल्याची माहिती पोतदार बंधू या नामवंत पेढीचे संचालक मिहिर पोतदार यांनी दिली.
अमेरिकेतील सिलिकॉन बँक बुडल्यामुळे सोन्याच्या भावात वाढ झाली आहे.सोन्याचा भाव वाढला असला तरी लोकांचा खरेदीचा उत्साह कायम आहे.पुढील काळात सोन्याचा भाव उतरण्याची शक्यता आहे.चोख सोन्यापेक्षा मंगळसूत्र,चेन,नेकलेस,बांगड्या, हार,अंगठ्या आदी तयार सोन्याच्या दागिन्यांना अधिक मागणी असल्याचे मिहिर पोतदार यांनी सांगितले.