ॲडलेड:भारतीय क्रिकेट टीमचे खेळाडू म्हणजेच कागदी वाघ कागदावरच पास झाले आहेत तर मैदानात पूर्णपणे ते नापास ठरले आहेत. येथे खेळण्यात येत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये यजमान ऑस्ट्रेलियाने भारतीय कागदी वाघांची जवळजवळ शिकार केली असून सावज शिकाऱ्याच्या आवाक्यात आले आहे. भारताच्या पहिला डाव फक्त 180 धावात गुंडाळला गेला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 337 धावा केल्याने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावांमध्ये जबरदस्त 157 धावांची आघाडी मिळाली आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या पाच बाद 128 धावा झाल्या होत्या. त्यामुळे कागदी वाघ अर्थात भारतीय संघ अजूनही 29 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे पाच गडी खेळायचे शिल्लक आहेत. त्यामुळे उर्वरित तीन दिवसांमध्ये ऑस्ट्रेलिया विजय मिळवेल असा अंदाज आहे.
भारतातर्फे पहिल्या डावांमध्ये नितेश कुमार रेड्डी यांनी सर्वाधिक 42 धावा केल्या होत्या. तो अजूनही खेळपट्टीवर नाबाद असून 15 धावावर खेळत आहे. ऋषभ पंत देखील नाबाद 28 धावांवर खेळत आहे. भारताची हीच भरवशाची जोडी आहे.
एक बाद शहाऐंशी वरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाने सर्व बाद 337 अशी मजबूत आणि आव्हानात्मक धावसंख्या रचली. त्याला प्रत्युत्तर देताना भारताचा दुसरा डाव सध्या तरी कोलमडला आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावांमध्ये ट्रॅव्हल्स हेड याने दमदार शतक केले त्याने 140 धावा केल्या. त्याला लाबूशेन आणि मॅकस्विनी या दोघांनी चांगली साथ दिली. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी चार-चार विकेट घेतल्या.
रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांची खरी कसोटी आहे. नाबाद राहिलेल्या ऋषभ पंत आणि नितीश कुमार रेड्डी यांनी सावध खेळी करणे गरजेचे आहे. नाहीतर यजमान ऑस्ट्रेलिया कागदी वाघांना कागदात गुंडाळल्याशिवाय राहणार नाही.
बुम बुम बुमराह
भारतीय अष्टपैलू आणि वेगवान गोलंदाज बूम बूम जसप्रीत बुमराह यांने या दुसऱ्या कसोटीमध्ये उस्मान याला बाद करून एका कॅलेंडर वर्षामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 50 विकेट घेतल्या आहेत. कपिल देव आणि झहीर खान नंतर अशी कामगिरी करणारा तो भारताचा तिसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने झहीर खान पेक्षा जास्त विकेट घेऊन झहीर खानचा विक्रम मागे टाकला आहे.