….. अन्यथा तळीरामांचा बंदोबस्त आम्हीच करू
कलखांब तलावाच्या सौंदर्याला बाधा
बेळगाव:तळीरामांकडून दारू पिऊन झाल्यानंतर कलखांब येथील तलावांमध्ये दारूची पाकिटे, बाटल्या , सिगारेटची पाकिटे व अन्य वस्तू टाकून देण्यात येत आहेत. त्यामुळे या तलावाच्या सौंदर्याला हानी पोहोचत आहे. त्यामुळे अशा तळीरामांवर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील जागरूक नागरिक करत आहेत.
सध्या व्यसनाधीन व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. असे हे व्यसनी युवक दारू पिऊन त्या तलावामध्ये रिकामी झालेली दारूची पाकिटे , दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे व अन्य हानिकारक वस्तू फेकून देत आहेत. त्यामुळे तलावाच्या सौंदर्याला हानी तर पोहोचत आहेच त्याचबरोबर तलावाचे पाणी सुद्धा खराब होत आहे. तसेच तलाव परिसरामध्ये दारूची पाकिटे, बाटल्या इतरत्र टाकून देण्यात येत आहेत. त्यामुळे तलावाबरोबरच तलावाचा परिसर सुद्धा खराब होत आहे. फोडून टाकलेल्या बाटल्यांच्या काचा तेथून ये- जा करणाऱ्या नागरिकांना लागण्याचा धोका निर्माण झाला आहे.
तळीरामांच्या या उपद्रवाला जागरूक नागरिक वैतागले आहेत. त्यांनी अशा संबंधित तळीरामांवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर त्यांचा बंदोबस्त झाला नाही तर आम्ही त्यांचा बंदोबस्त करू, असा इशारा देखील येथील नागरिकांनी दिला आहे. बघायला गेले तर आता तळीरामाचे काही खरे नाही, अशी चर्चा होत आहे.