येळ्ळूर यात्रा 21 पासून
भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन
बेळगाव:
येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी यात्रा उत्सवाला 21 एप्रिल पासून प्रारंभ होणार आहे. 21 ते 24 एप्रिल दरम्यान यात्रा उत्सव संपन्न होणार आहे. यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 24 एप्रिल रोजी महाराष्ट्र मैदानामध्ये भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवी तसेच कलमेश्वर देवस्थान असा संयुक्त यात्रा उत्सव संपन्न होणार आहे. सोमवार दि.21 रोजी सायंकाळी सहा नंतर आंबील गाड्यांची मिरवणूक निघणार आहे. मंगळवार दि. 22 रोजी श्री चांगळेश्वरी मंदिर आणि श्री कलमेश्वर मंदिरासमोर इंगळयाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार 23 रोजी श्री लक्ष्मी देवीचा वाढदिवस साजरा होणार आहे. गुरुवार 24 रोजी महाराष्ट्र मैदानामध्ये भव्य कुस्ती मैदान आयोजित केले आहे.
येळ्ळूरचे कुस्ती मैदान एक नावाजलेले कुस्ती मैदान म्हणून ओळखले जाते. या मैदानामध्ये आजपर्यंत अनेक नामवंत पैलवानांनी आपल्या कुस्तीचे प्रदर्शन केलेले आहे. एकापेक्षा एक दर्जेदार कुस्त्या या मैदानामध्ये पाहावयास मिळतात. त्यामुळे या कुस्ती मैदानाला लाखोच्या संख्येने कुस्ती शौकीन उपस्थिती दर्शवतात. कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी कुस्ती कमिटी परिश्रम घेत आहे. https://youtube.com/shorts/YdU6bmnjmFs?si=vhVNfY_kiHdc-Hkd
कुस्ती आखाडा तयार करण्यासाठी कुस्ती कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची जोरदार तयारी सुरू आहे. त्याचबरोबर कुस्ती शौकिनांना शेवटपर्यंत कुस्ती व्यवस्थितपणे पाहता यावी याचीही दखल कमिटी तर्फे घेण्यात येत आहे.