बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवीच्या मंदिर परिसरातील अनधिकृत दुकाने हटविण्यास विरोध झाल्याने तेथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अनधिकृत दुकाने हटवताना मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पण दुकानदार आणि स्थानिकांनी त्याला विरोध करून देवस्थाना समोर धरणे आंदोलन छेडले. यावेळी श्री यल्लम्मा देवी मंदिर विकास प्राधिकरणाचे आयुक्त अशोक दूंडगुटी यांना मंदिरातून बाहेर पडायला व्यापारी आणि स्थानिकांनी दिले नाही. व्यापारी आणि स्थानिकांनी ठिय्या आंदोलन करून दुकाने हटवण्यास विरोध दर्शवला.
तिरुपती देवस्थानाच्या धर्तीवर कर्नाटक सरकारने श्री यल्लमा देवी मंदिराचा विकास करून पर्यटकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे. केंद्र सरकारने देखील यासाठी कोट्यावधीचा निधी मंजूर केला आहे. कर्नाटक सरकारने देखील मंदिर परिसर विकासासाठी निधी मंजूर करून विकास आराखडा तयार केला आहे.
दरवर्षी श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशातून लाखो भक्त येत असतात. त्यांची निवास आणि अन्य व्यवस्था उत्तम तऱ्हेने करण्याची योजना आहे.शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, डायनिंग हॉल, वाहन तळ उभारण्यात येणार आहे.यासाठी विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून त्यावर आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.