मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एका आरोपीस गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी अटक केली.
हरिशकुमार बालकराम निशाद (२६) असे त्याचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशच्या बहराईच, कैसरगंज, गंडाराचा रहिवासी आहे. अटकेनंतर त्याला किल्ला न्यायालयाने २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्यांत अटक झालेला हरिशकुमार हा चौथा आरोपी आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत गुरमेल बलजित सिंग, धर्मराज राधे कश्यप आणि प्रवीण रामेश्वर लोणकर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ते तिघेही सध्या पोलिस कोठडीत आहेत.
१२ ऑक्टोबर २०२४ रोजी वांद्रे येथील निर्मलनगर, खेरनगर परिसरात बाबा सिद्दीकी यांची तीन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येनंतर पळून जाणाऱ्या तीनपैकी गुरमेल बलजित सिंग आणि धर्मराज राधे कश्यप या दोघांनाही पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. त्यांच्या चौकशीनंतर पुण्यातून प्रवीण लोणकर याला पोलिसांनी अटक केली होती.
याच गुन्ह्यात ते तिघेही पोलिस कोठडीत असून त्यांच्या चौकशीत या गुन्ह्यांत शिवकुमार गौतम ऊर्फ शिवा, मोहम्मद जिशान अख्तर, शुभम रामेश्वर लोणकर, हरिशकुमार निशाद यांचे नाव समोर आले होते. त्यांचा शोध सुरू असताना हरिशकुमार निशादला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.