अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने,चांदी खरेदीसाठी सराफ दुकानात गर्दी
साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने,चांदी खरेदी करण्यासाठी लोकांनी सराफी दुकानात गर्दी केली होती.
अक्षय तृतीयेच्या दिवशी बेळगावात दहा ग्रॅम सोन्याचा दर ६२०८० रू तर चांदीचा भाव किलोला ५७२०० रू इतका होता.सकाळ पासूनच सराफी दुकानात ग्राहकांची गर्दी दिसून आली.अनेक जणांनी मुहूर्त साधण्यासाठी अगोदरच सोने,चांदी खरेदीसाठी बुकिंग करून ठेवले होते.लग्न आणि अन्य शुभ कार्यासाठी म्हणून अनेक जणांनी चोख सोने ,चांदी यांची मुहूर्तावर खरेदी केली.सोन्याची चेन, ब्रेसलेट,अंगठी,नेकलेस,विविध प्रकारचे हार,मंगळसूत्र यांना ग्राहकाकडून अधिक मागणी होती.
चांदीचे ताट,तांब्या,अत्तर दाणी,गुलाबदाणी, फुलपात्र,देवांच्या मूर्ती,समई, निलांजन याची अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करण्याला ग्राहकांनी अधिक पसंदी दिली.केवळ बेळगाव आणि परिसरातील ग्राहकच नव्हे तर चंदगड, गोकाक,गडहिंग्लज,कोकण आणि गोव्यातून देखील ग्राहक खरेदीसाठी आलीची माहिती पोतदार बंधू या नामवंत पेढीचे संचालक मिहिर पोतदार यांनी दिली.