माघी पौर्णिमा अर्थात भरत पौर्णिमेच्या श्री सौंदत्ती यल्लमा देवीच्या यात्रेला बुधवारी दहा लाखाहून अधिक भाविक यल्लमा डोंगरावर दाखल झाले आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातून भाविक यात्रेसाठी आले आहेत. सकाळी महापूजा झाल्यावर देवीला नैवेद्य दाखवण्यात आला. सायंकाळी देखील देवींची विशेष पूजा करण्यात आली. वाहने आणि बैलगाडीतून भावीक यात्रेसाठी मुक्कामाला आले आहेत. सगळीकडे भंडाऱ्याची उधळण करण्यात येत होती. आई उधे ग आई उधेचा जयघोष भाविक करत होते.
मुक्कामाच्या ठिकाणीच पुरणपोळी करून जगाची पूजा करून नैवेद्य दाखवण्यात आला. हळद कुंकू, उदबत्ती आदी पूजा साहित्याची दुकानें थाटण्यात आली होती. कर्नाटक दुग्ध विकास महामंडळातर्फे सगळ्या भाविकांना मोफत ताकाचे वितरण करण्यात आले. जोगुळभावी येथे पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. एक हजाराहून अधिक पोलीसांचा बंदोबस्त यात्रेसाठी तैनात करण्यात आला आहे. पुढील पंधरा दिवस ही यात्रा चालणार आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्यासह देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अशोक दूंडगुट्टी यांनी यात्रेनिमित्त करण्यात आलेल्या सुविधांची पाहणी केली.