महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक शनिवार दिनांक ९ऑगस्ट रोजी युवा समिती कार्यालयात अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेकायदा कन्नड सक्ती विरोधात आणि मराठी भाषिकांना संविधानाने दिलेले भाषिक अधिकार मिळाले पाहिजे यासाठी सोमवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता धर्मवीर छ. संभाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयात भव्य मोर्चा काढण्यात येणार असून युवा समिती पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी पक्षभेद विसरून मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बैठकीत करण्यात आले.
अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले की संविधानाने दिलेले भाषिक अधिकार मिळविण्यासाठी समितीच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला, न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या, अल्पसंख्यांक आयोगाकडे दाद मागण्यात आली, पण वेळोवेळी प्रशासनाला सूचना देऊन देखील येथील प्रशासन मराठी भाषिकांना कोणतीही परिपत्रके किंवा भाषिक अधिकार बहाल करत नाही ही खेदाची बाब आहे, उलट कन्नड भाषा सक्ती राबवत असताना मराठी भाषेतील फलक काढण्यात येत आहेत, मराठी भाषेला आणि भाषिकांना दुय्यम वागणूक दिली जात आहे, त्या विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने भव्य मोर्चाचे आयोजन केले असून प्रत्येक मराठी भाषिकांनी पक्षभेद विसरून एकत्र येऊन सदर मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
यावेळी कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, खजिनदार विनायक कावळे यांनी सूचना मांडल्या.
बैठकीला उपाध्यक्ष वासू सामजी, पदाधिकारी सुरज कुडूचकर, किरण हुद्दार, रोहित गोमाणाचे, अक्षय बांबरकर, प्रवीण धामणेकर, हेमंत पाटील, शाम किरमटे, दिनेश मोरे, प्रतीक पाटील, अनिश पोटे आदी उपस्थित होते.
सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक आणि आभार मानले.