इनरव्हील क्लब आॕफ बेलगाम संस्थेची ‘आॕपरेशन मदत’ ग्रूपच्या माध्यमातून भटक्या विमुक्त (मंग्यानमारी) जातीच्या कुटुंबाना रेशन किटचे वितरण. –
भागात भटक्या विमुक्त जातीपैकी मंग्यानमारी जमातीचे लोक गाव-गाव बदलत जेथे काम मिळेल तेथे झोपड्या बांधून
रहात आपले जीवन जगत असतात. खानापूर तालुक्यातील माडीगुंजी या ठिकाणी या भटक्या मंग्यानमारी जमातीची काही कुटुंब बऱ्याच वर्षापासून झोपड्या बांधून रहात आहेत. सदर कुटुंबातील सदस्य आपले जीवन फार कष्टाने जगतात. या जमातीचे लोक पोटापाण्यासाठी मजल-दरमजल वेगवेगळ्या गावी आपली वस्ती हलवत असल्याने, एकाच गावी यांची कायमची वस्ती मिळत नाही. म्हणून यांच्याकडे स्वतःची कागदपत्रेही व दाखले ही नसतात. म्हणून यांची मुलं-मुली शाळेतच जात नसल्याने बहुतेक करून यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य अशिक्षित व मागासलेले दिसतात, क्वचितच एखाद-दुसरा शिकलेला आढळतो.
आपला चरीथार्थ चालवण्यासाठी कुटुंबातील महिला व मुलं-मुली जंगलातील रानमेवा गोळा करून रस्त्याशेजारी बसून विकतात. पुरूष लोक जंगलात वेगवेगळी (निलगिरी झाडे तोडणे, लाकडांच्या गाड्या भरणे, लाकडे फोडणे, जंगलातील मध काढणे, शेतातील कामे) कष्टाची कामे करून त्यातून मिळणाऱ्या तटपुंज्या पैशात हे गरीब मजूर लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांचे पोट भरतात. या लोकांना कधी काम मिळते कधी नाही, अशावेळी या कुटुंबातील सदस्य आजूबाजूच्या ओढ्यातील खेकडे व मासे पकडून ते शिजवून खातात. तसेच जंगलातील कंदमूळे हुडकून खातात. अशा कष्टमय रीतीने जीवन जगणाऱ्या या भटक्या विमुक्त (मंग्यानमारी) जमातीच्या लोकांची माहीती ‘आॕपरेशन मदत’ ग्रूपच्या कार्यकर्त्यांनी काढली. व येणाऱ्या दोन दिवसात भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अशा तळागाळातील मागासलेल्या भटक्या समाजातील कुटुंबांना मदत करायची ठरवली. त्याप्रमाणे सदर कुटुंबांची आॕपरेशन मदत ग्रूपच्या कार्यकर्त्यांनी चौकशी केली, आणि त्यांना मदत देण्याचे कबूल केले. येथील परिस्थिती राहुल पाटील यांनी आपल्या संस्थेच्या सहयोगी इनरव्हील क्लब आॕफ बेलगामच्या सदस्यांच्यासमोर ठेवली, तेव्हां सदर बेळगावच्या
इनरव्हील क्लबने ताबडतोब रेशन किटसाठी पुढाकार घेतला. व रेशन गोळा करायला मदत केली. त्यानूसार क्लबमार्फत गोळा केलेल्या या सर्व रेशन किटचे इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट मेधा शहा, सदस्य प्रियांका शहा व सपना काजगर तसेच आॕपरेशन मदत ग्रूपचे महेश हेब्बाळकर, बाळासाहेब चापगांवकर, नौशाद व राहुल पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच उपस्थित लहान बालकांना मिठाई, खाऊ, बिस्किटे व खजूर वाटण्यात आले. कुटुंबातील बरीच मंडळी कामासाठी बाहेरगावी गेली होती त्यामूळे संख्या मोजकी होती, यावेळी दत्तू निकम, सोनी निकम, तसेच गरजू कुटुंबातील लहान मुलं व महिला उपस्थित होत्या. सरतेशेवटी राहुल पाटील यांनी सदर भटक्या कुटुंबातील मुला-मुलींनी जर शाळेत जाऊन शिक्षण घ्यायची तयारी दाखवल्यास त्यांना सर्वोतोपरी शैक्षणिक साहित्याची मदत करू आणि कुटुंबांतील सदस्यांना कामेही उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले. तसेच पुढील वेळी येताना मुलांना कपडे, मिठाई व खेळण्यासाठी खेळणी घेऊन येऊ असे सांगितले.