मंगळवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर ओढ्याला आलेल्या पाण्यात स्कूल बस वाहून गेली असती पण लोकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.बसमधून वीस विद्यार्थी प्रवास करत होते.
हुक्केरी तालुक्यातील येलीमुन्नोळी गावाजवळील ओढ्याला मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी आले होते.रस्त्यावरून देखील पाणी मोठ्या प्रमाणावर वाहत असल्याने ओढा दिसत नव्हता.अशा परिस्थितीत देखील एका शाळेच्या बेजबाबदार बस चालकाने रस्त्यावर पाणी वाहत असताना देखील बस ओढ्या जवळ आणली .
यावेळी तेथे थांबलेल्या ग्रामस्थांनी आरडाओरडा करून बस थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.नंतर ग्रामस्थांनी पाण्यात अडकलेल्या बसमधून विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले.नंतर ग्रामस्थांनी बेजबाबदार बस चालकाला चांगलेच फैलावर घेतले.येलीमुन्नोळी गावातील बिरेश्र्वर शिक्षण संस्थेची ही बस होती.