कर्नाटकची महाराष्ट्राकडे पाच टी एम सी पाण्याची मागणी
पिण्याच्या पाण्याची उत्तर कर्नाटकात टंचाई जाणवत असल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राकडे पाच टी एम सी पाणी सोडण्याची विनंती केली आहे.
बेळगाव , कलबुर्गी आणि उत्तर कर्नाटकातील काही जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याने लोकांना आणि जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कृष्णा आणि भिमा नदीत पाच टी एम सी पाणी सोडावे अशी विनंती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
यापूर्वी देखील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई उदभवली असताना कृष्णा आणि भिमा नदीत पाणी सोडण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती.त्याला महाराष्ट्राने प्रतिसाद देऊन मे महीन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणी सोडले होते त्याबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्र सरकारला धन्यवाद दिले आहेत.आता उत्तर कर्नाटकात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्यामुळे पाच टी एम सी पाणी सोडावे अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या वारणा,कोयना जलाशयातून दोन टी एम सी पाणी कृष्णा नदीत सोडावे.त्याचा प्रमाणे महाराष्ट्राच्या उजनी जलाशयातून भिमा नदीला तीन टी एम सी पाणी सोडावे अशी विनंती करण्यात आली आहे.