हेल्मेट वापरा, जीव वाचवा! बेळगावमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती सप्ताहाला सुरुवात
बेळगाव : शहरातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी बेळगाव पोलिसांनी विशेष 'हेल्मेट जनजागृती सप्ताहा'ची सुरुवात केली आहे. राणी चन्नम्मा चौक येथे उत्तर विभागाचे आयजीपी संदीप पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान वाहनधारकांना रस्ता सुरक्षेबाबत माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले.
उत्तर विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये मागील तीन वर्षांत दरवर्षी सरासरी दोन हजार प्राणांतिक अपघातांची नोंद झाली असल्याची माहिती आयजीपी संदीप पाटील यांनी दिली. केवळ दंडात्मक कारवाईने अपघात रोखता येणार नसून, प्रत्येक नागरिकाने वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले की, अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आठवडाभर विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले जाईल. तसेच विना हेल्मेट दुचाकीस्वारांना पेट्रोल न देण्याच्या मोहिमेसाठी पेट्रोल पंप चालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी सांगितले की, जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ८०० ते ८५० नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो, तर सुमारे तीन हजार जण जखमी होतात. वाहतूक पोलिसांची कारवाई ही नागरिकांच्या सुरक्षेसाठीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमांतर्गत पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतः हेल्मेट घालून वाहन चालवत नागरिकांना सुरक्षित प्रवासाचा संदेश दिला.
"हेल्मेट ही सक्ती नाही, तर जीवनाची सुरक्षा आहे" — असा संदेश या अभियानातून देण्यात आला आहे.
