बेळगाव | 23 ऑगस्ट 2026 : आयुर्वेदाच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षांपासून वैद्यकीय सेवा, जनजागृती आणि समाजसेवा करणारे बेळगावचे प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. रुपेश साळुंखे यांना ‘कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. बंगळुरू येथे 23 ऑगस्ट रोजी झालेल्या विशेष समारंभात त्यांच्या आयुर्वेद क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
डॉ. रुपेश साळुंखे हे बेळगावातील सोमवार पेठ, टिळकवाडी येथील अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटर येथे प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. आयुर्वेदाच्या माध्यमातून विविध आजारांवर उपचार करतानाच समाजामध्ये आयुर्वेदाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे.
हा पुरस्कार सिग्नेचर मीडिया हाऊस यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. पुरस्कार सोहळ्याला पद्मश्री डॉ. कामिनी राव, प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गिरीश नवसोंदी तसेच कर्नाटक होमिओपॅथी बोर्डाचे अध्यक्ष डॉ. रुद्रेश यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आयुर्वेदाचा प्रसार, प्रचार आणि रुग्णसेवेच्या माध्यमातून गेल्या अडीच दशकांपासून डॉ. साळुंखे यांनी दिलेल्या योगदानाची या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेण्यात आली. बेळगाव आणि परिसरातील नागरिकांनी त्यांच्या उपचारपद्धतीवर दाखविलेला विश्वास हीच आपल्या कार्याची मोठी पावती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
डॉ. रुपेश साळुंखे यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्याची यापूर्वीही विविध पुरस्कारांनी दखल घेण्यात आली आहे. त्यांना धन्वंतरी पुरस्कार, द प्राइड ऑफ महाराष्ट्र, आयुर्वेद भास्कर पुरस्कार, बेस्ट फिजिशियन ऑफ आयुर्वेद, नॅशनल अचिव्हमेंट अवॉर्ड फॉर हेल्थ एक्सलन्स इंडिया आणि प्रेरणामूर्ती पुरस्कार अशा विविध सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.
कॅन्सर, संधिवात, मणक्याशी संबंधित विकार, मेंदूचे विकार, त्वचारोग तसेच पचनसंस्थेशी निगडित तक्रारी अशा विविध आरोग्य समस्यांमध्ये डॉ. साळुंखे यांचे विशेष कार्य आहे. पंचकर्मासोबत मेडिकल योग थेरपीचा वापर ही त्यांच्या उपचारपद्धतीची वैशिष्ट्यपूर्ण बाजू मानली जाते.
डॉ. रुपेश साळुंखे यांच्या या प्रदीर्घ वैद्यकीय प्रवासात त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सौ. संध्या नेरलेकर यांचा मोलाचा वाटा असल्याचे नमूद करण्यात आले. त्यांच्या सहकार्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील वाटचाल अधिक सक्षमपणे सुरू ठेवता आल्याचेही सांगण्यात आले.
‘कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न’ पुरस्कारामुळे डॉ. रुपेश साळुंखे यांच्या २५ वर्षांच्या आयुर्वेद सेवेला आणखी एक मानाचा तुरा लाभला आहे. त्यांच्या पुढील आयुर्वेदिक आणि सामाजिक कार्याच्या वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

