नेहरू नगर परिसरातील श्री वीर हनुमान मंदिरात शनिवारी घडलेल्या एका अनोख्या घटनेने भाविकांसह शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. मारुतीच्या दर्शनासाठी आल्याप्रमाणे एक माकड मंदिरात प्रवेश करून गाभाऱ्यासमोरील लोखंडी पाईपवर बराच वेळ शांतपणे बसून राहिल्याचे पाहायला मिळाले.
शनिवार असल्याने मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. मात्र, मंदिरात उपस्थित असलेल्या कोणत्याही भक्ताला माकडाने त्रास दिला नाही किंवा कोणताही गोंधळ घातला नाही. त्यामुळे भाविकांनीही शांततेने दर्शन घेत या अनोख्या प्रसंगाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, माकड बराच वेळ गाभाऱ्याकडे एकटक पाहत बसले होते. त्याची शांत मुद्रा आणि मंदिरातील वावर पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून बेळगाव शहरात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
या घटनेकडे अनेकांनी श्रद्धा आणि भावनेच्या दृष्टीने पाहिले, तर काहींनी हा वन्य प्राण्याच्या नैसर्गिक वर्तनाचा भाग असल्याचे मत व्यक्त केले. कोणतीही अधिकृत धार्मिक किंवा वैज्ञानिक पुष्टी नसली तरी या अनोख्या प्रसंगाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
