बेळगाव : श्रद्धा, भक्ती आणि रेजिमेंटल उत्साहाच्या वातावरणात द मराठा एलआयआरसी, बेळगाव येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ४ सप्टेंबर रोजी झालेल्या धार्मिक कार्यक्रमात अधिकारी, जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
या निमित्ताने मिलिटरी महादेव मंदिरात विशेष पूजा, प्रार्थना आणि नैवेद्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. द मराठा एलआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय, एसएम, व्हीएसएम आणि फॅमिली वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा वेद उपाध्याय यांच्यासह अधिकारी, जेसीओ, जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या धार्मिक सोहळ्यात सहभाग घेतला.
जन्माष्टमीच्या उत्सवाचा उत्साह दुसऱ्या दिवशी, म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंतर-बटालियन दहीहंडी स्पर्धेत पाहायला मिळाला. विविध बटालियनच्या संघांनी प्रचंड उत्साह आणि जोशात या स्पर्धेत सहभाग नोंदविला.
दहीहंडी फोडण्यासाठी उभारण्यात आलेल्या मानवी मनोऱ्यांमधून सैनिकांचा संघभावना, समन्वय, निर्धार आणि परस्पर सहकार्य दिसून आले. या स्पर्धेमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
धार्मिक श्रद्धा, भारतीय सांस्कृतिक परंपरा आणि रेजिमेंटल एकात्मतेचा सुंदर संगम या उत्सवाच्या माध्यमातून अनुभवायला मिळाला. या सोहळ्याने सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांमधील परस्पर बंध अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
